शालेय सहल

साईबन मध्ये शालेय सहल

शाळा म्हटले की, शैक्षणिक सहलीची आठवण येते. शाळेकडून शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी एकाच दिवसाची सहल नेली जायची. या शैक्षणिक सहली म्हणजे एक शालेय उपक्रमच होय. पूर्वी शालेय संस्था या फक्त शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे असणा-या स्थळांना, विद्यार्थ्यांना घेऊन जायचे जसे की, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे, वाचनालये, परंतु आता ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणिय स्थळे, गडकिल्ले, समुद्रकिनारे, विविध संग्रहालये, कारखाने अशा विविध स्थळांवर नेल्या जातात. सध्या हा ट्रेंडसुद्धा बदलताना दिसत आहे. महाविद्यालयांच्या धर्तीवर शाळांच्या सहली वॉटर पार्क, समुद्रकिनारी अशा ठिकाणी काढल्या जातात, हा बदलता ट्रेंड पर्यटनवाढीसाठी उपयुक्त ठरत असला तरी यातून विद्यार्थ्यांना आपल्या परिसराबाहेरील शहरांची माहिती होण्यास कितपत उपयुक्त होते, हे पाहणे गरजेचे ठरावे. अशा शैक्षणिक सहली काढण्यामागे शालेय संस्थेचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे मुलांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पाडणे.