प्री वेडींग फोटोशूट

साईबन मध्ये प्री वेडींग फोटोशूट

'प्री-वेडिंग' ही संकल्पना तरुणाईच्या गळी उतरवणाऱ्या किमयागारांनी ही वेगळीच फिल्मी दुनिया त्यांच्यासाठी वास्तवात उतरवली आहे

लग्नाचं चित्रीकरण करण्यापेक्षाही लग्नाआधी असे हटके अल्बम करण्याची इच्छा अनेक जोडपी व्यक्त करतात, कारण लग्नाचे विधी सुरू असताना किंवा त्या दिवशी प्री-वेडिंग शूटसाठी तयारी करणंच शक्य नसतं, असं वेडिंग फोटोग्राफर सरीन चवरकर याने सांगितलं. प्री-वेडिंग शूटसाठी ही जोडपी खास सुट्टी घेतात. हे शूट करण्यासाठी आम्हाला साधारणत: एक ते दोन दिवस लागतात. खरं म्हणजे प्री-वेडिंग शूट करण्याआधी आम्ही त्यांना काही कल्पना ऐकवतो. त्यांच्या मनात काही गोष्टी असतील तर ते आम्हाला सांगतात. वास्तविक प्रत्येक जोडपं हे फिल्म किंवा एखाद्या गाण्यानेच प्रभावित झालेले असतात. त्यामुळे फोटोत फिल्मीपणा आणावाच लागतो. त्या हिशोबाने त्या जोडप्याने तसे हावभाव देणं गरजेचं असतं, असं म्हणतो. फोटोपेक्षाही व्हिडीओत हे क्षण कै द करणं अनेक जोडप्यांना आवडतं. हे अल्बम्स करताना जोडप्यांना नेमकं कोणतं गाणं, चित्रीकरण, ड्रेसेस काय हवेत याबद्दलच्या कल्पना ऐकताना फोटोग्राफर्सची दमछाक होत नसेल तरच नवल! ‘अगदी हुबेहूब अमुक एका गाण्यातल्या व्हिडीओप्रमाणे त्यात दाखवलेल्या गोष्टी त्यांना हव्या असतात,’ असं वेडिंग फोटोग्राफर मितेश देधिया याने सांगितलं. बॉलीवूडपट आणि त्यांची गाणी आवडणारी जशी जोडपी आहेत तसंच अनेकांना हॉलीवूड चित्रपटातून ज्या पद्धतीने लग्नाचा सोहळा साजरा होतो त्या पद्धतीने किंवा डेस्टिनेशन वेडिंगचे परदेशातील व्हिडीओ पाहून त्या पद्धतीने शूट करण्याची इच्छा व्यक्त करतात, अशी माहिती वेडिंग फोटोग्राफर तृशांत तेली याने दिली.

खरं तर प्री-वेडिंग शूट हे सध्याचं वेड आहे, त्यामुळे ते करताना अनेक गमतीदार किस्से घडतात. शूटिंगचं लोकेशन कुठलं इथपासून ते त्यासाठी कपडे जमवणं, मेकअप-हेअर ड्रेसिंग ही आधीची तयारी. त्यानंतर त्यांच्याकडून पोजेस मिळवणं, चेहऱ्यावर त्यांना हव्या त्या गाण्यानुसार हावभाव मिळवणं यासाठी बराच तामझाम करावा लागतो. या शूटसाठी येणाऱ्या जोडप्यांचं एक तर नुकतंच लग्न ठरलेलं असतं. अनेकदा कांदेपोहेवालं लग्न असेल तर ते एकमेकांना नवीन असतात. त्यामुळे त्या दोघांमधला अवघडलेपणा घालवून त्यांना एकत्र पोज देण्यासाठी खूप विनवण्या कराव्या लागतात. बरं लव्ह मॅरेज असलं तरी त्यांच्याकडून प्रेमाचे ते हावभाव मिळतातच असं नाही. दोघांपैकी कोणी तरी एक फार लाजऱ्या स्वभावाचा असेल तर पोज देण्यासाठीही त्यांना विनवण्या कराव्या लागतात, असं तृषांत म्हणतो. कित्येकदा याच्या अगदी उलट अनुभवही येतात. एखादं जोडपं खूप उत्साही असतं तेव्हा आमच्याकडून अगदी हजार ते अडीच हजार फोटो काढून घेतात, त्यासाठी वेळ देतात. त्यांची प्रत्येक पोज वेगळीच असावी लागते, नाही तर मग त्यात वेगळेपणा दिसत नाही आणि ते जास्त आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी भरपूर टेक घ्यावे लागतात, कारण प्रत्येक प्री-वेडिंग शूटसाठी आलेल्या जोडप्यांची मागणी अफाट असते. एक तर अशा शूटसाठी दिवसभरात सकाळ किंवा संध्याकाळ या दोनच वेळा चांगल्या असतात. मग दोन-तीन तास नुसतं शूटिंग होतं आणि असे पुन्हा त्यांच्या गरजांनुसार दोन ते तीन दिवस शूट चालतं, असं सरीनने सांगितलं.